सामाजिक द्वेष वाढवणाऱ्या घटनांची संख्या वाढत असताना सामाजिक समता आणि एकात्मतेचे तत्त्वज्ञान रुजवणारा वारीचा सोहळा आशेचा किरण आहे. वारीत सहभागी होताना मनात उमटलेले विचारतरंग.
-जयंत पाटील
उन्हाची तीव्रता सरली आणि पावसाच्या सरी कोसळल्या की, वारकऱ्याला सावळ्या विठ्ठलाची ओढ लागते. संसाराच्या सुखदुःखाच्या गोष्टींना विसरत खांद्यावर भगवी पताका घेत मुखात श्रीहरी विठ्ठलाच्या नामाचा जयघोष करत विठ्ठल भक्तीचा चैतन्य सोहळा सुरू होता. 'सकळासी येथे आहे अधिकार' म्हणत कोणताही एक विशिष्ट रंग मनावर न ओढत वारकऱ्यांचा अठरापगड जातीत विखुरलेला समाज विठ्ठलभक्तीच्या उदात्त अशा भावनेने शेकडो मैलाचे अंतर पायी कापून चंद्रभागेच्या वाळवंटी जमा होतो. जाती, वर्ण, धर्म, प्रांत, भाषा या क्षुद्र भेदाभेदांना येथे स्थान नाही. याठिकाणी उच-नीचतेच्या, श्रेष्ठ- कनिष्ठतेच्या विचारांनाही थारा नाही.
पंढरीच्या लोकां, नाही अभिमान। पाया पडे जन। एकमेकां ।।
हे संतवचन आषाढ़ी वारीतील सामाजिक समतेचे अधिष्ठान आहे. हेच या संप्रदायाचे खरे वैभव आहे. कोणाचं वाईट करू नये, कोणाचं वाईट चिंतू नये, सर्वांचं भलं व्हावं अशी इच्छा मनात असणारा माणूस खरा माळकरी. असं हे मानवतेचं तत्त्वज्ञान वारकऱ्याच्या मनात रुजलेले असते. जातिव्यवस्था समतेच्या आड येणारी आहे, हे संतांनी जाणले आणि वारकरी संप्रदायाच्या रूपाने त्यावर उत्तर शोधले. संतांनी आपल्या कालखंडात समाजातील अनिष्ट रूढी, परंपरा, कर्मकांडे, अंधश्रद्धा, अज्ञान ही दूरिते दूर केली. प्रसंगी समाजाचा रोषही पत्करला; परंतु भक्ती आणि प्रबोधनाची सांगड तोडली नाही.
विभागलेल्या समाजाला समतेचे मूल्य समजावताना ज्ञानेश्वर माउलींनी 'जो जे वांछिल तो ते लाहो' असा विश्वव्यापी उदात्त विचार मांडला. संत तुकाराम महाराजांनी तर एक पाऊल पुढे जात 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे' असे म्हणत समतेचे मूल्य केवळ मानवप्राण्यापुरते न ठेवता ते साऱ्या सजीवांना लागू केले.
सातशे वर्षापूर्वी वारकरी संतांनी स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, बरोबर स्त्री सक्षमीकरण हा विचार मांडला. स्त्रीसंत जनाबाई, कान्होपात्रा, सोयराबाई यांनी वारकरी चळवळीचे नेतृत्व केले. संतांच्या विचारांच्या परंपरेतून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामविकासाचा, तर संत गाडगेबाबांनी स्वच्छतेचा मंत्र सांगितला. अनेक समाज सुधारकांनी स्वातंत्र्य, समता, बंधुभावाबरोबर स्त्री सबलीकरण व अंधश्रद्धा निर्मूलन केले.
महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आध्यात्मिक एकात्मतेचा महाउत्सव बाराव्या शतकापासून अखंड सुरू आहे. बदलत्या काळानुसार वारीतही अनेक बदल घडून येत आहेत. आधुनिकतेची कास धरत आता वारीही डिजिटल झाली आहे. जीन्स, टी शर्ट घातलेली तरूण शहरी मंडळीदेखील हातात टाळ घेऊन दिंडीत सहभागी होत आहेत. आज बदलत्या काळात सामाजिक द्वेष वाढवणाऱ्या घटनांची संख्या वाढत असताना सामाजिक समता आणि एकात्मतेचे तत्त्वज्ञान रुजवणारा वारीचा सोहळा आशेचा किरण आहे. ही समतेची वारी महाराष्ट्राच्या वैभवात भर घालो, हीच पंढरीच्या विठुरायाचरणी प्रार्थना!
(लेखक 'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार' या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत.)
Comments